साळशीच्या इनामदार श्री देव सिद्धेश्वर पावणाई देवस्थानचा ऐतिहासिक दसरोत्सव शाही थाटात

*कोंकण एक्सप्रेस
*साळशीच्या इनामदार श्री देव सिद्धेश्वर पावणाई देवस्थानचा ऐतिहासिक दसरोत्सव शाही थाटात
*शिरगांव : संतोष साळसकर
हर हर महादेवाच्या जय घोषात ऐतिहासिक वारसा लाभलेल्या देवगड तालुक्यातील साळशी येथील ईनामदार श्री देव सिद्धेश्वर- पावणाई देवस्थानचा नवरात्रौत्सव व विजयादशमीचा ( सिमोल्लंघण ) कार्यक्रम बुध. 21 ऑक्टो. रोजी मोठ्या शाही थाटात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला.
यावेळी ढोलताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत ‘हर हर महादेव’च्या जयघोष करण्यात आला. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या 84 खेड्यांचा अधिपती असलेल्या देवस्थानच्या उत्सवाला भाविकांची अलोट गर्दी लाभली. अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी प्रथम श्री पावणाई देवी मंदिरातील गाभाऱ्यात घटस्थापना केली जाते. या 9 दिवसात नित्य नियमाने दर दिवशी सप्तशती पाठवाचन, देवीची ओटी भरणे, आरती, दुपारी ब्राह्मणा करवी नैवेद्य करून 12 स्थळांना दाखविला जातो. तसेच मानकरी, देवाचे नोकर, घडशी व गोंधळी यांनाही नैवेद्य दिला जातो. घडशी व गोंधळी यांचे सभा मंडपात सुश्राव्य गायन व वादन होते. त्यानंतर नौबत, प्रवचन झाल्यावर आरती, पालखी मिरवणूक करण्यात येते . प्रदक्षिणेच्या वेळी ज्या ज्या ठिकाणी पालखी थांबते त्या त्या ठिकाणी घडशी, गोंधळी गुणिजन ( साळस्कर ) हे नादसुरात सुश्राव्य गायन वादन करतात.
नवमीच्या दिवशी सकाळी नवचंडी पाठ वाचनाचा व नंतर नवचंडी होम हवनादी तसेच अजोबळी दानाचा कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी 12 स्थळांना महाप्रसाद दिला जातो. त्यानंतर 'लळीत' कार्यक्रमात रात्री 12 वाजल्यानंतर नाटकाचा कार्यक्रम पार पडतो. लळीत कार्यक्रमाची सांगता पहाटे काकड आरतीने होते.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी विजयादशमीला सकाळ पासून देवीची ओटी भरणी करण्यासाठी माहेरवाशीणी स्त्रियांची रांग लागते. सायंकाळी तरंग ( देव ) सहित ढोल ताशांच्या गजरात मशालदार, अबदागीर, निशाणदार, चोरवीदार, घडशी, गोंधळी, देवाचे सेवेकरी अशा लव्या जमासह बारा पाच मानकरी, सर्व ग्रामस्थ, भाविक सिमोल्लंघणासाठी जातात. त्या ठिकाणी आपट्याच्या ( शमीच्या ) झाडाची पुरोहिताकरवी पूजा करून त्या झाडांच्या फांद्या व पाने सोन्याच्या स्वरूपात लुटून देवांना अर्पण करतात.त्यानंतर देवता परत येताना 84 च्या चाळ्याला भेट देऊन देव परतीला येताना मार्गात सौभाग्यवती स्त्रिया आरती ( तळी ) घेऊन देवाच्या स्वागतास सज्ज असतात.
त्यानंतर श्री गांगो ईटलाई देवीचीं भेट घेऊन देवता प्रथम श्री सिद्धेश्वर देवालयाच्या सभोवती फेरी मारून झाल्यावर श्रीदेवी पावणाई देवालया सभोवती तसेच रवळनाथ मंदिरा सभोवती फिरून दरबारात येतात.
विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी श्री देव सिद्धेश्वर व श्री देवी पावणाई या दोन्ही मंदिरात अभिषेक झाल्यावर शिवकळा काढून येणाऱ्या भाविकांची विनंती, गाऱ्हाणी ऐकून जाबजबाब केला जातो.
हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी तसेच देवदर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. या देवीची ओटी भरण्यासाठी व देवदर्शनासाठी माहेरवाशीणीही आवर्जून येतात. तर चाकरमान्यांची उपस्थिती लक्षणीय होती. शिरगाव दशक्रोशीतील असंख्य भाविकांच्या अलोट गर्दीत मंदिर परिसर फुलून गेला होता.
जाहिरात



