देश आणि संस्कृती टिकली तरच पदवीधर-शिक्षक टिकतील : आमदार प्रमोद जठार

*कोंकण एक्सप्रेस
*देश आणि संस्कृती टिकली तरच पदवीधर-शिक्षक टिकतील : आमदार प्रमोद जठार
*राधानगरी : प्रतिनिधि
पदवीधर-शिक्षकांचा विश्वास, हाच भाजपचा विजय; दोन्ही उमेदवारांना विजयी करण्यासाठी आमदार प्रमोद जठार मैदानात!
भारतीय जनता पार्टी राधानगरी तालुका कार्यालय येथे पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ प्रचार बैठक संपन्न
“आपला देश टिकला, आपली संस्कृती टिकली तरच आपला पदवीधर आणि शिक्षक टिकेल. सनातन संस्कृतीचा वारसा हजारो वर्षे पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. संस्कृतीच्या रक्षणासाठी आणि राष्ट्रहितासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काम केले पाहिजे,” असे प्रतिपादन आमदार प्रमोद जठार यांनी केले.
भारतीय जनता पक्षाच्या राधानगरी तालुका कार्यालयात पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ अनुषंगाने आयोजित प्रचार बैठकीत ते बोलत होते. पुणे पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता जाधव तसेच शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन जठार यांनी केले.
यावेळी बोलताना जठार म्हणाले की, भारतीय जनता पक्षाची स्थापना केवळ राजकारण करण्यासाठी झालेली नसून देशहित, राष्ट्रवाद आणि भारतीय संस्कृतीचे जतन करण्याच्या व्यापक उद्देशाने पक्ष कार्यरत आहे. सनातन संस्कृतीने अनेक हजार वर्षांचा वारसा जपला आहे. हा वारसा भविष्यातील पिढ्यांपर्यंत पोहोचविणे ही प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे. त्यामुळे शिक्षक आणि पदवीधर मतदारांशी सातत्याने संपर्क साधून त्यांच्या प्रश्नांवर काम करण्याची गरज आहे.
“पदवीधर आणि शिक्षकांनी Gen-Z पिढीचे प्रश्न समजून घेत त्यावर प्रभावीपणे काम केले पाहिजे. बदलत्या काळानुसार शिक्षण, रोजगार, तंत्रज्ञान आणि नव्या पिढीसमोरील आव्हानांवर ठोस भूमिका घेणे आवश्यक आहे,” असेही जठार यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करताना जठार यांनी “नरेंद्र मोदी हे युगपुरुष असून त्यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहे,” असे नमूद केले. आगामी निवडणुकीत भाजपच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने मतदारांपर्यंत पोहोचून प्रभावी प्रचार करण्याचे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, विरोधकांवर टीका करताना जठार यांनी विरोधकांना “झुरळे” अशी उपमा देत ते बाहेरून आलेले असल्याचे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे बैठकीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले.
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी संघटनात्मक पातळीवर नियोजन, मतदारांशी थेट संवाद आणि कार्यकर्त्यांनी बूथनिहाय प्रचार करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
यावेळी कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, जिल्हा उपाध्यक्ष संभाजी आरंडे, जिल्हा सरचिटणीस डॉ. सुभाष जाधव, धीरज करलकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रवीश पाटील, पश्चिम मंडल अध्यक्ष स्वप्नील जरग, पूर्व मंडल अध्यक्ष संतोष कातिवले, रवि काणेकर, निलेश साळुंखे, सागर पाटील, नवनाथ कुंभार, महाजन सर, बुडके सर, प्रशांत भाळकर, सकपाळ सर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जाहिरात